सखी सुखदा फाउंडेशनच्या श्रवण तपासणी शिबिराला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; सुदृढ समाजासाठी सदैव कटिबद्ध – मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : कोथरूड येथे ‘सखी सुखदा फाउंडेशन’च्या वतीने नवजात बालकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या विशेष श्रवण तपासणी शिबिराला पालकांचा भरघोस आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या अत्यंत स्तुत्य उपक्रमाबद्दल राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आयोजकांचे कौतुक करत आभार व्यक्त केले आहेत.
या प्रसंगी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, “सुदृढ आणि सशक्त समाज निर्मितीच्या संकल्पासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. नवजात बालकांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणारा हा उपक्रम कोथरूडमधील बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
“कोथरूडमधील या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी ‘सखी सुखदा फाउंडेशन’च्या संचालिका सौ. स्मिता पाटील यांचे विशेष कौतुक केले. तसेच, या शिबिरासाठी आपले मोलाचे वैद्यकीय सहकार्य देणारे ‘सूर्यप्रभा हॉस्पिटल’चे ज्येष्ठ डॉक्टर डॉ. शरद शाह आणि त्यांच्या संपूर्ण वैद्यकीय टीमचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनापासून आभार मानले. या शिबिरामुळे अनेक पालकांना आपल्या नवजात बालकांच्या श्रवण क्षमतेची वेळेत तपासणी करून घेता आली.