आज सर्वत्र अनुभवायला मिळालेले राममय वातावरण आणि सर्वत्र प्रभू श्रीरामांचा जयघोष पुन्हा रामराज्य प्रस्थापित होणार आहे याचे धोतक – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : हाच तो ऐतिहासिक व सुवर्ण क्षण ! अयोध्येतील भव्य श्री राम मंदिर येथे आज प्रभू श्री राम यांची प्राण-प्रतिष्ठापना करण्यात आली. हा क्षण म्हणजे अनेकांनी पाहिलेले स्वप्न आहे जे आज प्रत्यक्षात जगता येणार आहे. आजचा मंगल दिन वास्तव ठरावा यासाठी अनेकांचे योगदान लाभले. आज आपल्या सर्वांचे आराध्य दैवत, मर्यादा पुरूषोत्तम प्रभू श्रीरामांची अयोध्येतील भव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली . त्यामुळे संपूर्ण देश राममय झाला आहे. प्रभू श्रीरामांनी आपल्या संपूर्ण जीवनातून सदाचारी जीवन आणि सेवेचे महत्त्व अधोरेखित केले होते. त्यामुळे आजच्या पावन दिनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकाळची सुरुवात कोथरुड मधील आरोग्य शिबीरास भेट देऊन केली.
चंद्रकांत पाटील यांनी आज शनिवार पेठेतील श्री बालाजी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तद्नंतर पुणेकरांचे श्रद्धास्थान तुळशीबाग मंदिरात जाऊन मनोभावे पूजा केली. याप्रसंगी सर्वांच्या मांगल्यसाठी प्रार्थना केली. त्यानंतर सदाशिव पेठेतील राम मंदिरात समर्थ रामदास स्वामींच्या पादुकांचे दर्शन देखील घेतले. या रम्य सकाळी सर्वत्र अनुभवायला मिळालेले राममय वातावरण आणि सर्वत्र प्रभू श्रीरामांचा जयघोष पुन्हा रामराज्य प्रस्थापित होणार आहे याचे धोतक असल्याचे पाटील यांनी यावेळी म्हटले.