मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरूडमध्ये ‘निसर्गछाया सीनियर सिटीझन्स क्लब’चे लोकार्पण; ज्येष्ठांना मिळणार जिव्हाळ्याचे व्यासपीठ
पुणे : आपल्या परिवारातील ज्येष्ठ नागरिक हे आपल्या संस्कृतीचे आणि घराचे आधारस्तंभ असतात. त्यांच्या चेहऱ्यावर निखळ हास्य फुलवणे हे आपले कर्तव्यच आहे. याच भावनेतून, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोथरुडमधील पहिल्या ‘महात्मा सोसायटी क्लबहाऊस कॅफेटेरिया’येथे ‘देवगावकर फाउंडेशन’च्या माध्यमातून ‘निसर्गछाया सीनियर सिटीझन्स क्लब’ या नव्या आणि जिव्हाळ्याच्या उपक्रमाचे लोकार्पण अत्यंत उत्साहात संपन्न झाले. आपल्या लाडक्या वडिलधाऱ्यांसाठी हे केंद्र सुरू करताना मला मनापासून आनंद होत असल्याच्या भावना पाटील यांनी व्यक्त केल्या.
यावेळी पाटील म्हणाले, हा क्लब कोथरुडमधील ज्येष्ठ नागरिकांना हक्काचे, आनंदाचे आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारे एक सुंदर व्यासपीठ ठरेल. असा मला विश्वास आहे. इथे आपल्या कुटुंबातील या मायेच्या सावलीला विसावा मिळावा म्हणून आरामदायी व्यवस्था, सुख-दुःखाच्या गप्पांसोबतच कॅरम, बुद्धिबळ आणि पत्ते यांसारखे खेळ खेळता येतील. तसेच शासनाच्या विविध योजनांच्या माहितीसाठी व मदतीसाठी तिथे नेहमीच एक हक्काचा मार्गदर्शक उपलब्ध असेल. आपल्या ज्येष्ठांच्या आयुष्यात नवी ऊर्जा देणे, हाच माझ्या वाढदिवसाचा सर्वात अनमोल आनंद असल्याचे पाटील म्हणाले.
या सोहळ्याप्रसंगी देवगावकर फाऊंडेशनचे मंदार देवगावकर आणि अमृता देवगावकर यांच्यासह महात्मा सोसायटीचे सर्व सभासद आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.