दगडूशेठच्या बाप्पाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा मान… हा निर्णय पुण्याच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि पर्यटन वैभवाला नवी ओळख देणारा ठरणार – मंत्री चंद्रकांत पाटील

10

पुणे : पुण्याचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला राज्य सरकारने ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा प्रदान करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. हा निर्णय पुण्याच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि पर्यटन वैभवाला नवी ओळख देणारा ठरणार असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं.

याबाबत पाटील म्हणाले, देश-विदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांसाठी यामुळे अधिक आधुनिक आणि जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील. या अभिमानास्पद निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांचे पाटील यांनी मनःपूर्वक आभार मानले तसेच दगडूशेठ ट्रस्ट आणि सर्व पुणेकरांचे देखील त्यांनी हार्दिक अभिनंदन केले.

राज्य सरकार जेथे दरवर्षी लाखो-करोडो पर्यटक किंवा भाविक भेट देतात, ज्या वास्तूंचे ऐतिहासिक, धार्मिक किंवा सांस्कृतिक महत्त्व अनन्यसाधारण असते, अशा प्रमुख स्थळांना पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा देते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी १८९३ मध्ये या गणेशमूर्तीची स्थापना केली होती. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला या मंदिराने आणि ट्रस्टने नेहमीच मोठे बळ दिले आहे. आज हे मंदिर केवळ धार्मिक केंद्र नसून, ट्रस्टच्या माध्यमातून चालणाऱ्या विविध सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय उपक्रमांमुळे समाजसेवेचे एक मोठे केंद्र बनले आहे.

या मानाच्या आणि हक्काच्या दर्जामुळे दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला येणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास आणि दर्शन अधिक सुलभ व आनंददायी होण्यास मोठी मदत होणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.