मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले इस्कॉन मंदिरात श्रीकृष्णाचे दर्शन; तुषार भोसले यांच्या ‘गोविंद गीतम्’ कार्यक्रमाला लावली हजेरी
पुणे : महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी रविवारी कात्रज येथील जगप्रसिद्ध इस्कॉन (ISKCON) मंदिराला भेट देऊन भगवान श्रीकृष्णांचे मनोभावे दर्शन घेतले. मंदिरातील अत्यंत भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरणात मनाला एक वेगळी ऊर्जा आणि परम समाधान लाभल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या भेटीदरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंदिरात आयोजित प्रसिद्ध गायक तुषार भोसले यांच्या ‘गोविंद गीतम्’ या विशेष भक्तिरसपूर्ण कार्यक्रमाला उपस्थिती लावली. तुषार भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करत त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. “भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि भक्तीपरंपरेचा सुंदर संगम असलेला हा कार्यक्रम उपस्थितांसाठी खरोखरच अविस्मरणीय ठरला,” असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि आमदार श्रीकांत भारतीय हे देखील प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनीही भगवान श्रीकृष्णांचे दर्शन घेत या आध्यात्मिक सोहळ्याचा आनंद घेतला.
यावेळी इस्कॉन मंदिर प्रशासनाच्या वतीने मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा शाल व प्रसादाची भेट देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या भक्ती सोहळ्याला पुण्यातील शेकडो कृष्णभक्त आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.