“माझ्यासाठी ‘कोथरूड’ हेच माझे विशाल कुटुंब”; ‘निसर्ग छाया’ येथे उपस्थित रहात मंत्री चंद्रकांत पाटील सपत्नीक ज्येष्ठ नागरिकांच्या आनंदात सहभागी

6

पुणे : सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या व्यक्तीचे वैयक्तिक जीवन हे संपूर्ण समाजासाठीच समर्पित असते. संपूर्ण समाज हेच आपले कुटुंब असते आणि माझ्यासाठी तर ‘कोथरूड’ हे माझे विशाल कुटुंब आहे,” अशा अत्यंत भावुक आणि कृतज्ञतापूर्वक भावना महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत. ‘निसर्ग छाया’ उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी आलेल्या आपल्या कोथरूड परिवारातील आदरणीय ज्येष्ठ नागरिकांच्या आनंदात चंद्रकांत पाटील आपल्या पत्नीसह सहभागी झाले होते.

पाटील यावेळी म्हणाले, या कोथरुड परिवारातील आदरणीय ज्येष्ठ नागरिकांसोबत घालवलेले आजचे सुवर्णक्षण शब्दांत मांडणे कठीण आहे. ‘निसर्ग छाया’ या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या आनंदात सपत्नीक सहभागी होण्याचा आणि त्यांच्या साथीने सुखाचे चार क्षण अनुभवण्याचा परमभाग्याचा योग आज आला. वयाच्या या टप्प्यावरही त्यांच्या चेहऱ्यावरील ते निष्पाप हास्य आणि डोळ्यांतील आपुलकी मनाला एक वेगळीच ऊर्जा देऊन गेली. घराघरात मायेची सावली धरणार्‍या या वडिलधाऱ्या मंडळींसोबत व्यतीत केलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी अत्यंत भावुक आणि संस्मरणीय ठरला.

त्यांच्या अनुभवांची समृद्ध शिदोरी आणि त्यांनी मायेने आमच्या पाठीवर ठेवलेला वरदहस्त, मला जनसेवेच्या मार्गावर अविरत चालण्याची नवी ताकद देतो. तुमचे हे अथांग प्रेम आणि आशीर्वाद हीच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई आहे!, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

Get real time updates directly on you device, subscribe now.