मोबाईल-टीव्हीच्या आभासी दुनियेपासून दूर… कोथरूडमध्ये बालदोस्तांच्या समर कॅम्पमध्ये रमले मंत्री चंद्रकांत पाटील!
पुणे : नेहमीच्या शासकीय बैठका आणि राजकीय व्यस्ततेतून वेळ काढत, महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज कोथरूड येथील ‘नाट्यतीर्थ फाऊंडेशन’च्या समर कॅम्पला सदिच्छा भेट दिली. यावेळी मंत्रिपदाचा कोणताही आव न आणता राजशिष्टाचार बाजूला ठेवून ते थेट लहान मुलांमध्ये मिसळले आणि त्यांनी बालमित्रांशी मनमोकळा संवाद साधला.
या भेटीदरम्यान शिबिरातील चिमुकली शिवन्या बुचके हिने ‘आई’ या अत्यंत संवेदनशील विषयावर एक सुंदर नाट्यकृती सादर केली. तिचा हा निरागस आणि प्रभावी अभिनय पाहून मंत्री चंद्रकांत पाटील खरोखरच भारावून गेले. त्यांनी शिवन्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आणि तिला एक छोटीशी भेटवस्तू देऊन तिचे कौतुक करत पुढील प्रवासासाठी प्रोत्साहित केले.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुले मोबाईल आणि टीव्हीच्या जाळ्यात अडकत चालली आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना मंत्री पाटील म्हणाले, “उन्हाळ्याच्या सुट्टीत मोबाईल-टीव्हीच्या आभासी दुनियेपासून दूर राहत, प्रत्यक्ष मैदानावर आणि मंचावर अभिनयाचे धडे गिरवणाऱ्या या सर्व बालदोस्तांचे मला कौतुक वाटते. तसेच मुलांना हे हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘नाट्यतीर्थ फाऊंडेशन’ या संस्थेचे काम अत्यंत कौतुकास्पद आहे. या लहानग्यांच्या विश्वात व्यतीत केलेले हे निखळ आणि आनंदाचे क्षण माझ्या सदैव स्मरणात राहतील.
या कौटुंबिक आणि उत्साही सोहळ्याप्रसंगी नाट्यतीर्थ फाऊंडेशनचे पदाधिकारी, प्रशिक्षक, शिबिरात सहभागी झालेले अनेक बालकलाकार आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.