जनता शिक्षण संस्थेच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त संस्थापक दादासाहेब जगताप आणि माईसाहेब यांच्या पुतळ्यांचे अनावरण; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून गौरव

5

पुणे : शिक्षणाच्या माध्यमातून समाजघडणीचे आणि बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना संस्कारक्षम बनवण्याचे महान कार्य करणाऱ्या ‘जनता शिक्षण संस्थे’च्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रमुख उपस्थिती लावून संस्थेच्या प्रदीर्घ वाटचालीचे कौतुक केले. या मंगलप्रसंगी त्यांनी जनता शिक्षण संस्थेला आणि विद्यार्थी परिवाराला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या दिमाखदार सोहळ्याला चिंचवडचे आमदार शंकरभाऊ जगताप, संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश जगताप, उपाध्यक्ष रमेश कार्ले, कार्याध्यक्ष महेश आगम, कविता गोरे यांच्यासह संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ, सदस्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेचे आद्य संस्थापक आदरणीय दादासाहेब जगताप आणि माईसाहेब यांच्या नूतन पुतळ्यांचे अनावरण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अत्यंत सन्मानपूर्वक करण्यात आले. या दोन्ही महान विभूतींच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय कार्याला यावेळी विनम्र अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, जनता शिक्षण संस्थेची ७४ वर्षांची प्रदीर्घ आणि अविरत वाटचाल निश्चितच प्रेरणादायी आहे. दादासाहेब जगताप आणि माईसाहेब यांनी लावलेले हे शैक्षणिक रोपटे आज एका मोठ्या वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. त्यांच्या विचारांचा आणि मूल्यांचा पवित्र वारसा पुढे नेत, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी संस्थेची ही ज्ञानगंगा अशीच यशस्वीपणे अखंड वाहत राहो, हीच सदिच्छा.

१७ ऑगस्ट १९५२ रोजी स्थापन झालेल्या जनता शिक्षण संस्थेने ग्रामीण भागातील गरीब, गरजू आणि वंचित विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. शिक्षण हे केवळ काही मोजक्या लोकांचे अधिकार नसून प्रत्येक मुला-मुलीचा मूलभूत हक्क आहे, या विचारातून संस्थेची वाटचाल सुरू झाली आणि आजही त्याच विचाराला पुढे नेले जात आहे.

आज संस्थेच्या १३ शाखांमधून सुमारे १५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शालेय शिक्षणापासून कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, मराठी व इंग्रजी माध्यम, व्यावसायिक अभ्यासक्रम आणि मोफत ग्रंथालय अशा विविध क्षेत्रांत संस्था कार्यरत आहे. पुणे शहरासोबतच ग्रामीण भागातही शिक्षणाची दारे खुली करून अनेक पिढ्यांच्या जीवनाला दिशा देण्याचे मोठे कार्य संस्थेने केले आहे.

संस्थापकांच्या विचारांचा वारसा पुढे नेत शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडविण्याचे हे कार्य यापुढेही अधिक व्यापक व्हावे आणि संस्थेचा ज्ञानदीप असाच तेवत राहावा, ही सदिच्छा यावेळी आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केली.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.