पोटनिवडणुकीत भाजपाला मतरूपी आशीर्वाद देऊन विजयी करा, चंद्रकांत पाटील यांचे तुळशीबाग छोटे व्यावसायिक आणि पथारी व्यावसायिकांना आवाहन

20
पुणे : येत्या २६ फेब्रुवारीला कसबा आणि चिंचवड येथील विधानसभा पोटनिवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीची सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. भाजपकडून तर प्रचाराचा धुमधडाका सुरु आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील मागील अनेक दिवसांपासून या निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. भाजपाला विजयी करण्याचा जणू त्यांनी निश्चयच केला आहे. आज त्यांनी विधानसभेच्या कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ तुळशीबाग छोटे व्यावसायिक असोसिएशन आणि पथारी व्यावसायिकांशी संवाद साधला.
चंद्रकांत पाटील यांनी आज तुळशीबाग छोटे व्यावसायिक असोसिएशन आणि पथारी व्यावसायिकांशी संवाद साधताना म्हटले कि, भाजपाचा नेहमीच छोट्या व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न असतो. कोव्हिडच्या काळात पथारी व्यावसायिक मोठ्या संकटात होते‌. त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक उपाययोजना करण्यात आल्या. मविआ सरकारने पथारी व्यवसायिकांची मोठी कोंडी केली होती. विरोधी पक्षात असताना आम्ही पथारी व्यावसायिकांसाठी मोठा संघर्ष केला, याची आठवण चंद्रकांत पाटील यांनी करून दिली.
व्यावसायिकांच्या संघर्षाबाबत बोलत असताना पाटील म्हणाले कि, हेमंत रासनेंसारखा आमचा कार्यकर्ता त्यावेळी रस्त्यावर उतरून संघर्ष करत होता. त्यामुळे पोटनिवडणुकीत भाजपाला मतरूपी आशीर्वाद देऊन विजयी करा, असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं.

Get real time updates directly on you device, subscribe now.