रस्त्याची कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

90

पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ डीजीमधील न्हावरा ते चौफुला रस्त्याचे उन्नतीकरण व मजबुतीकरण कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या रस्त्याची कामे पूर्ण झाल्यावर रहदारीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. शेतकऱ्यांचा शेतीमाल लवकरात लवकर बाजारपेठेत पोहचण्यास मदत होणार आहे. रस्त्याची कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले.कामे नियोजनानुसार पूर्ण करण्याचे निर्देश देखील त्यांनी संबंधितांना दिले.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, जिल्ह्यात सुमारे ४६ हजार १०९ कोटी रुपयांची रस्त्याची कामे सुरु आहेत. त्यामध्ये आळंदी ते पंढरपूर दरम्यान संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग ७ हजार २९३ कोटी, देहू ते पंढरपूर दरम्यान संत तुकाराम पालखी मार्ग ४ हजार ४१५ कोटी, चांदणी चौक उड्डाणपूल ४०० कोटी, नाशिक फाटा ते राजगुरूनगर उड्डाणपूल ८ हजार कोटी, तळेगाव-चाकण-शिक्रापूर दुमजली उड्डाणपूल ११ हजार कोटी, पुणे-शिरुर दुमजली उड्डाणपूल १३ हजार ५०० कोटी, शिंदेवाडी-वरंधाघाट ७२३ कोटी, उंडवडी-बारामती-फलटण ५७८ कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत.

यावेळी पाटील यांनी न्हावरा येथील मल्लिकार्जुन देवस्थान परिसर विकासासाठी ५० लाख रुपये देण्याची घोषणा केली. तसेच शाहू-फुले-आंबेडकर अभ्यासिकेत पुस्तक खरेदी करणे, हनुमान मंदीर जीर्णोद्धार, उपजिल्हा रुग्णालय, उप जिल्हा सह निबंधक कार्यालय, पोलीस स्थानक, तालुका कृषि मंडळ मंजूर करणे आदी मागणीनिहाय प्रस्ताव सादर करण्याचा सूचना देखील पाटील यांनी केल्या.
न्हावरा ते चौफुला रस्ता रस्ता चाकण, शिक्रापूर, शिरुर, सुपा, कुरकुंभ आदी महत्वाच्या औद्योगिक वसाहतींना जोडण्यास उपयुक्त ठरतो व त्यामुळे औद्योगिक विकासास चालना मिळणार आहे. वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न कायम स्वरुपी निकालात निघणार आहे. रहदारीच्या रस्त्यावरुन कमी वेळात प्रवास करणे शक्य होणार आहे. इंधनाची बचत, सुरक्षित वाहतूक करणे, यामुळे शक्य होणार आहे.

यावेळी आमदार ॲड. राहुल कुल, राष्ट्रीय महामार्गचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, न्हावरा ग्रामपंचायतीचे सदस्य अलका शेंडगे आदी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.