महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले

पुणे , १४ एप्रिल : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त आज पुणे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

चंद्रकांत पाटील यांनी याठिकाणी डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भिम बांधवांसाठी आयोजित केलेल्या एकता मिसळमध्ये योगदान दिले. पुणे रेल्वे स्टेशन रस्ता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे हि मिसळ तयार करून अभिवादन करण्यात आले आहे. आज तब्बल सहा हजार किलोची मिसळ तयार करण्यात आली आहे. मनसेचे माजी आमदार दीपक पायगुडे यांच्या पुढाकाराने प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी हि मिसळ तयार केली आहे. पुणेकरांसह सर्वपक्षीय नेत्यांनी यात सहभाग घेतला. चंद्रकांत पाटील यांनी देखील येथे हजेरी लावत मिसळ बनवण्यात सहभाग घेतला.

समतेचे हे प्रतिक नव्या पीढिला समजावे यासाठी आयोजित चित्रसृष्टीचे लोकार्पण

यासोबतच चंद्रकांत पाटील यांनी आज चित्रसृष्टीचे देखील लोकार्पण केले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण जीवनात त्यांनी जे अनेक क्रांतिकारी बदल घडवले, त्यामध्ये महाडमधील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचे मोठे महत्त्व आहे. महाडमधील या तळ्याचे पाणी सर्वांसाठी खुले व्हावे व दलित बांधवांनाही पाण्याचे पाणी वापरता यावे; यासाठीचा हा सत्याग्रह होता. या लढ्याची आठवण ‘समतेचे प्रतीक’ म्हणूनही केली जाते. समतेचे हे प्रतिक नव्या पीढिला समजावे, यासाठी माजी नगरसेविका अर्चना पाटील यांच्या प्रयत्नातून सेवन लव्ह चौकात चित्रसृष्टी साकारण्यात आली आहे. आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीचे औचित्य साधून या चित्रसृष्टीचे लोकार्पण चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.