ज्यांच्या कुणबी नोंदी सापडत नाहीत त्या मराठ्यांना आरक्षण देण्याचा कायदा केला जाईल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील 

2

पुणे: पुणे पुस्तक महोत्सवास आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली मुदत संपली आहे आणि विधिमंडळाचे अधिवेशन देखील संपले आहे. अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत काय चर्चा झाली असा प्रश्न माध्यमांनी पाटील यांना विचारला. यावर पाटील म्हणाले कि, मनोज जरांगे आणि सरकारमधील संवाद अतिशय उत्तम सुरु आहे.

पाटील पुढे म्हणाले कि जरांगे यांनी  ज्या ज्या मागण्या मांडल्या आहेत त्या मागण्या बहुतांश पूर्ण होत चालल्या आहेत. कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही म्हणून जरांगे यांच्या उपोषणाची सुरुवात झाली. स्वतःचे कुणबी प्रमाणपत्र, मग कुणबी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र आणि आता सरसकट कुणबी प्रमाणपत्र अशा त्यांच्या मागण्यांचा प्रवास राहिला आहे. कुणबी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र मिळत नाही असे त्यांचे जे मत आहे, त्याबाबत त्यांचे आता बरेच समाधान झाले आहे, असे माझे मत असल्याचे पाटील म्हणाले.
पाटील पुढे म्हणाले कि, आतापर्यंत काही लाख नोंदी सापडल्या आहेत. पण या नोंदी काही लपवून ठेवलेल्या नव्हत्या. साधारणपणे वैयक्तिक मागणी केल्यावर असे प्रमाणपत्र मिळते, पण समाज म्हणून प्रमाणपत्र मिळण्याची मागणी झाल्यावर सरकारने समिती नेमली. त्यामुळे आता काही कोटी लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल. म्हणून जरांगे पाटील समाधानी आहेत, असे पाटील म्हणाले.
ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी पर्याय म्हणजे मराठा मागास आहे हे सिद्ध करणं आणि  मराठा आरक्षणासाठी पुन्हा एक कायदा करावा लागेल. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडत नाहीत त्या मराठ्यांना आरक्षण देण्याचा कायदा केला जाईल. तो कायदा करताना आत्तापर्यंत कायदा टिकला नाही त्याची कारण लक्षात घेऊन काम केलं जाईल असे पाटील म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.