पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून राबविलेल्या ६५ हजार वृक्षरोपण मोहिमेचा भाग म्हणून आज पाषाण मधील तुकाई टेकडी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, वसुंधरेचे संवर्धन ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे, याच भावनेतून या मोहिमेला उपस्थित माझे सहकारी आणि कार्यकर्ते यांनी माझ्यासमवेत रोपण केलेल्या १००० वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारी घेतली आहे. या मोहिमेस पाषाण मधील माता भगिनींसह लहान मुलांचा देखील उत्तम प्रतिसाद लाभला असल्याचे पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांचा १० जून रोजी ६५ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त पाटील यांनी महाराष्ट्रभर ६५००० झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. याची सुरुवात त्यांनी कोथरूड मधील म्हातोबा टेकडीपासून केली आणि आज पाषाण मधील तुकाई टेकडी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.