विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या मतदार याद्यांमधील दोष दूर करावेत, चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी तयार झालेल्या मतदार याद्यांमध्ये गंभीर त्रुटी असल्याने पुण्यासह महाराष्ट्रातील असंख्य मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या मतदार याद्यांमधील दोष दूर कराव्यात, यासाठी आज भारतीय जनता पार्टी, पुणे शहरच्या शिष्टमंडळासोबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक प्रमुख सुहास दिवसे यांची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेऊन निवेदन दिले. मतदार याद्यांमधील त्रुटींकडे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
लोकसभा निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ पाहायला मिळाला. अनेक लोकांची नावे याद्यांमध्ये नव्हती. 2019 मध्ये ज्यांनी मतदान केले असे मतदार 2024च्या लोकसभा निवडणुकीत मतदान करू शकले नाहीत. अनेक मतदारांची नावे पूर्णत: काढून टाकल्याने ते मतदानापासून वंचित राहिले शिवाय राजकीय पक्षांकडून सर्व माहिती दिल्यावरही नवीन मतदारांची नावे यादीत समाविष्ठ झाली नाहीत, असे मत भाजपकडून व्यक्त करण्यात आले.
या सर्व गोष्टींचा विचार करत मतदार याद्यांमधील या सर्व त्रुटी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्या. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक योग्य प्रकारे होईल आणि मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल, अशी अपेक्षा यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
या वेळी आ. माधुरीताई मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, योगेश टिळेकर, भाजपा पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांच्यासह भाजपाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.