नेचर वॉक संस्था आणि गोल्डन लीफ बँक्वेट हॉलतर्फे आयोजित ‘वाईल्ड इंडिया’ वन्यजीव महोत्सवास चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती
पुणे : नेचर वॉक संस्था आणि गोल्डन लीफ बँक्वेट हॉलतर्फे आयोजित ‘वाईल्ड इंडिया’ वन्यजीव महोत्सवाची शुक्रावारपासून सुरुवात झाली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पहिल्या दिवशी सुप्रसिद्ध वन्यजीव चित्रपटकार नरेश बेदी आणि राजेश बेदी ‘मोनार्क्स ऑफ द हिमालयाज’ या हिमालयातील जैवविविधतेवरील माहितीपटाचा पाटील यांनी आस्वाद घेतला. या माहितीपटाचे प्रत्येक दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे होते. या महोत्सवास शुभेच्छा देताना, पर्यावरण संवर्धन वन्यजीव संरक्षणासाठी लोकसहभाग वाढला पाहिजे अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.
चंद्रकांत पाटील म्हणाले, कला आणि निसर्ग यांच्यातील संबंध बहुआयामी आणि चिरस्थायी आहे, जे आपण राहत असलेल्या जगाच्या सौंदर्य, विविधता आणि नाजूकपणाबद्दल मानवतेचे खोलवर बसलेले आकर्षण प्रतिबिंबित करते. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच निसर्ग चित्रांचे वेगळेच आकर्षण असते. लहान मुले चित्र रेखाटण्यासाठी जेव्हा कुंचला ( ब्रश) किंवा पेन्सिल हातात घेतात तेव्हा सर्वात पहिला आपल्या कल्पनाविश्वाप्रमाणे निसर्ग चित्रच रेखाटतात. या कार्यक्रमात सात वर्षांच्या आरुष पवारने काढलेले चित्र पाहून अतिशय थक्क झालो. त्याने आपल्या कुंचल्यातून साकारलेले चित्र म्हणजे एका कसलेल्या चित्रकाराप्रमाणेच होते. त्यामुळे त्याचे कौतुक शब्दात करणे कठीण आहे, असे पाटील म्हणाले.
यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्रीय सशक्तीकरण समितीचे सदस्य आणि राज्याचे माजी प्रधान मुख्य संरक्षक सुनील लिमये, पुण्याचे मुख्य वनसंरक्षक(प्रादेशिक) एन. आर. प्रवीण, भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, नेचर वॉकचे महेश नामपूरकर, उद्योजक विक्रम अग्रवाल, सुरेश शर्मा, चंद्रसेन शिरोळे यांच्यासह वन्यजीव प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.