जेईई ॲडव्हान्स्ड २०२६ मध्ये पुण्याची आरोही देशपांडे मुलींमध्ये देशात अव्वल; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून मनःपूर्वक अभिनंदन

10

पुणे : देशातील अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘जेईई ॲडव्हान्स्ड २०२६’ या परीक्षेत मुलींमध्ये अव्वल क्रमांक पटकावून पुण्याच्या कु. आरोही देशपांडे हिने देशपातळीवर उत्तुंग यश संपादन केले आहे. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीने महाराष्ट्राचा गौरव देशभरात उंचावला असून राज्याच्या शैक्षणिक परंपरेला नवा बहुमान प्राप्त करून दिला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आरोहीचे मनःपूर्वक अभिनंदन करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

कु. आरोही देशपांडे हिने मिळवलेले हे यश तिच्या कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास, आत्मविश्वास आणि उत्कृष्टतेच्या ध्यासाचे फळ आहे. अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या या परीक्षेत देशात अव्वल येण्याची तिची ही यशोगाथा राज्यातील आणि देशातील लाखो विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरणारी आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. हिने देशपातळीवर ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे.

आरोहीच्या या यशाची पाळेमुळे पुणे शहरात रुजलेली आहेत. तिने आपले इयत्ता ८ वी पर्यंतचे शालेय शिक्षण पाषाण येथील ‘लोकसेवा ई-स्कूल’ मधून पूर्ण केले. त्यानंतर तिच्या स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीला खंबीर पाठिंबा देण्यासाठी तिच्या अभियंता पालकांनी थेट कोटा (राजस्थान) येथे स्थलांतर केले. आयआयटी दिल्ली झोनमधून (IIT Delhi Zone) परीक्षा देत तिने कमालीचे सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर हे घवघवीत यश मिळवले.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आरोहीच्या या यशाचे कौतुक करताना म्हटले की, पुण्याच्या या लेकीने मिळवलेल्या यशाचा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे. त्यांनी कु. आरोही देशपांडे हिचे मनापासून अभिनंदन केले असून, तिच्या पुढील उच्च शैक्षणिक वाटचालीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.