जी-२० बैठकी निमित्त आयोजित प्रदर्शनासाठी चोख बंदोबस्त ठेवा, पोलीस आयुक्तालय येथील आढावा बैठकीत चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

पुणे : जी-२० परिषदेच्या चौथ्या शिक्षण कार्य गटाचे चर्चासत्र १९ ते २१ जून दरम्यान पुण्यात होणार आहे.जी-२० शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित शैक्षणिक प्रदर्शनास मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी भेट देणार असल्याने सुरक्षेच्यादृष्टीने चोख बंदोबस्त ठेवावा, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.जी-२० बैठकीनिमित्त आयोजित प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियोजन करण्यासाठी पोलीस आयुक्तालय पुणे येथे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, बैठकीसाठी येणाऱ्या परदेशी प्रतिनिधींच्या सुरक्षेबाबत अत्यंत गांभीर्याने लक्ष द्यावे. शैक्षणिक प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असल्याने सुमारे ४ ते ५ लाख विद्यार्थी भेट देण्याची शक्यता आहे. विद्यार्थी शाळेच्या बसेसने येणार असल्याने वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यात यावे. नागरिकांना वाहतूककोंडीचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी पुरेशा प्रमाणात पिण्याच्या पाण्याची आणि तात्पुरत्या स्वच्छतागृहाची सोय करावी, त्यासाठी महानगरपालिकेचे सहकार्य घ्यावे, असे हि त्यांनी सांगितले.

 

तसेच सुरक्षाविषयक समन्वयासाठी कमांड सेंटरची स्थापना करण्यात आली असून वाहतूक नियोजनासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. ऑनलाईन सुविधेद्वारे विद्यार्थ्यांना भेटीची पूर्वनियोजित वेळ देण्यात येत असून एकाच वेळी गर्दी होऊ नये याची दक्षता घेण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

 

बैठकीस पोलीस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील , विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रवी शिंगणापूरकर आणि शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!